शनिवार, 26 जुलाई 2008

मलाय भाषा ......पु.ल. देशपांडे


पुर्वरंग सात-आठ दिवसांत मी सिंगापुरात रुळु लागलो होतो। मलाय भाषेतल्या काही शब्दांवर तर माझा फारच लोभ जडला. विद्दाधर चेंबुरकर हा पार्लेकर असल्यामुळे त्याच्या अस्सल भाषाप्रभुत्वाविषयी मला शंका नव्हती. परंतु त्याच्या बायकोने टेलिफोनवरुन कुणाला तरी "साला!" म्हणून रिसिव्हर आपटल्यावर मी मात्र जरासा गडबडलो. पण तिच्याही लक्षात माझी अस्वस्थता आली असावी. "मलाय भाषेत ` रॉंग नंबर' असे टेलिफोनवर म्हणायचे असेल तर `साला!' म्हणतात." हे ऎकून त्या भाषेचा यथार्थ शब्दयोजना-सामर्थ्यावर माझे एकदम प्रेम बसले. `ट्रिंग ट्रिंग' ऎसा `खोटा नंबर' फिरल्यावर `हलो हलो' ला `साला' ह्यासारखे समर्पक उत्तरे दुसरे मला तरी सुचत नाही! हे दु:ख टेलिफोनशी घनिष्ठ संबंध असणाऱ्यांनाच कळावे. रात्री बाराएकच्या सुमारास गाढ निद्रेतून जागे करणारी ती क्षुद्र घंटिका! `हॅलो' म्हणून आपण विचारतो आणि पलिकडून कुणीतरी `केम सुखमडल सेठ----' अशी प्रस्तावना करून `न्यूयोर्क कोटन' बद्दल अगम्य भाषेत बोलू लागतो. अशा वेळी `साला!' हा मलाय शब्द काय चपखल बसेल! वा! जगात असे आंतरराष्ट्रीय सुबक शब्द जमवून भाषा बनवली पाहिजे. होय आणि नाही यांना मात्र मलाय `आडा' आणि `तिडा' तितकेसे चांगले वाटत नाहीत. आणि एकदा मला चहात दुध हवे होते असे कुजबुजल्यावर आमच्या मित्राच्या पत्नीने मोलकरणीला `बाबा लागी सुसू' म्हटल्यावर मी दचकलो! पण मलाय भाषेत दुधाला `सुसू' म्हणतात. `बाबा' म्हणजे आण आणि `लागी' म्हणजे काय कोण जाणे!


बाकी ही भाषा फार सोपी आहे. प्रत्ययबित्यय भानगडी कमी! शब्द एकमेकांसमोर ठेवायचे. मलाय भाषेचेचे अधिक सुंदर स्वरुप म्हणजे `बहासा इंडोनेशिया'. संस्कृत शब्दांचा यात खूप भरणा आहे. इंडोनेशिया तर ठायीठायी संस्कृतचे ठसे आहेत. मलायात आणि इंडोनेशियात मुख्य धर्म इस्लाम, पण ह्या इंडोनेशियातल्या इस्लामी बंधूंवर प्राचीन भारतीय संस्कृतीचा छाप टिकून आहे. अर्थात काही शब्द भलतेच घोटाळ्यात टाकतात. मलायमध्ये मोठ्या बहिणीला `काका' म्हणतात. पण `काकी' म्हणजे पाय! डुकराला `बाबी' म्हणतात! छातीला `दादा' म्हणतात, पण पाठीला वहिनी म्हणत नाहीत! डोळ्याला `माता' पण `मातामाता' असे दोनदा म्हटले की पोलीस! आजीला `नेने' पण आजोबा लेले नव्हेत! अनेकवचने करणे फार सोपे. तोच शब्द दोनदा उच्चारायचा! `मुका' म्हणजे चेहरा आणि `मुकामुका' म्हणजे चेहरे. चेहरा आणि मुका यांचे अद्वैत मानणारे हे लोक थोरच. पण खरा मुका घेण्याला मात्र `चिओंब' म्हणून चुंबण्याच्या जवळ जातात. छातीला `दादा' म्हणणारे बहाद्दर हदयाला `चिंता' म्हणतात आणि प्रेयसीला चिंतातुर न म्हणता `चिंता मानिस' म्हणतात. `मानीस' म्हणजे गोड! आणि `पडास' म्हणजे तिखट! बाकी मलाय स्त्रिया क्वचीत मानिस चिंता करायला लावतातही. एखाद्या सुस्तनीची दादागिरी कां चालते हे मलायात गेल्यावर अधिक कळते.

कोई टिप्पणी नहीं: